मुलांमधील मानसिक समस्या व उपाय

रात्री अंथरुण ओले करणे: 
शक्यतो झोपण्यापूर्वी १ तास तरी त्याला कुठलेही पेय देऊ नये.
झोपण्याच्या आधी त्याला प्रसाधनगृहात जाऊन यायला सांगावे.
ज्या वेळी मूल अंथरुण ओले करते, त्याच्या १५ मिनिटे आधी गजर लावून त्याला उठवावे आणि प्रसाधनगृहात नेऊन आणावे.
काही दिवसांनंतर गजर झाल्यावर मूल स्वतःच उठून प्रसाधनगृहात जाऊ लागेल, असे उत्तेजन त्याला द्यावे. त्यानंतर गजराच्या घड्याळाचे त्याच्यापासूनचे अंतर हळूहळू वाढवत जावे. मग गजर नसला, तरी मूत्राशय भरल्यावर त्याला जाग येईल.
ज्या रात्री त्याने अंथरुण ओले केले नसेल, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला पारितोषिक द्यावे, म्हणजे त्याला स्वतःहून प्रयत्न करायला प्रोत्साहन मिळेल.
मूल झोपल्यानंतर पहिली ५ मिनिटे ‘जेव्हा मूत्राशय भरेल, तेव्हा तुला जाग येईल. जाग आल्यानंतर तू प्रसाधनगृहात जाऊन येशील आणि परत गाढ झोपी जाशील’, अशी सूचना सतत कमीत कमी दोन मास तरी द्यावी.

मुलांना अंधार, झुरळे, पाली इत्यादी ची भीती वाटणे: 
ज्या वेळी वरीलपैकी एखाद्या कारणामुळे मूल घाबरलेले असेल, त्या वेळी त्याला प्रेमाने जवळ घ्यावे आणि धीर द्यावा. त्याची चेष्टा करू नये किंवा त्याला रागावू नये.
अंधाराची भीती जावी; म्हणून त्याला आधी दिवा लावून झोपायला सांगावे. थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने ‘अल्प उजेड पडेल’, असा दिवा लावावा. याची त्याला सवय झाली, म्हणजे नंतर दिवा लावला नाही, तरी मूल न घाबरता झोपू शकते.

नखे कुरतडणे, अंगठा चोखणे, केस ओढणे इत्यादी सवयी: 
मुलांना नखे कुरतडल्याने होणारे अपाय समजावून सांगावे. मुल जर अधून मधून नखे कुरतडतांना दिसले, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम कारण काही वेळेला हट्टी मुले न ऐकण्याचा भाग म्हणून ते जाणून बुजून करतात. मात्र त्याला नखे कुरतडण्याची सवय लागली असेल, तर नखांतील घाण पोटात गेल्यामुळे कसा अपाय होतो, हे समजावून सांगितले पाहिजे. मुलींना ‘तू नखे कुरतडल्यास ती चांगली दिसत नाहीत; पण नखे न कुरतडल्याने हात सुंदर दिसतात. नखांना तेल लावून ती मऊ ठेवल्यास ती कुरतडण्याचे प्रमाण अल्प होते; कारण मऊ नखे कुरतडणे मुलांना आवडत नाही.
मूल झोपल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत सूचना देणे : मूल झोपल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत आपण जागेपणी सांगतो, तसे नखे कुरतडण्यविषयी समजावून सांगावे. नंतर ‘नखे कुरतडायला प्रारंभ करताच तुला त्याची जाणीव होईल आणि तू ते थांबवू शकशील’, अशी सूचना द्यावी; कारण झोपेची पहिली ५ मिनिटे संमोहनावस्थेसारखी असतात. त्या कालावधीत सूचनांचा चांगला परिणाम होतो.
वाईट सवय सुटण्यासाठी बक्षिसे देणे : कधी कधी ‘नखे कुरतडली नाहीस, तर बक्षिसे देऊ’, असे सांगून मुलाला अयोग्य सवय सोडण्यासाठी उत्तेजन देता येते.
अघोरी उपचार करणे टाळावे : नखाला कडू औषध लावणे, चिकटपट्टी, स्टिकींग प्लास्टर लावणे इत्यादी उपचार मुळीच करू नयेत. अशाने ती सवय वाढण्याचा संभव असतो.
अंगठा चोखणे, केस ओढणे इत्यादी सवयी असल्यासही वरीलप्रमाणे उपायपद्धत राबवू शकतो.

खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी: 
मुलांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी असतील, तर त्याच्यासाठी आई-वडिलांनी जरा अधिक वेळ द्यावा. म्हणजे ‘आई-वडिलांचे आपल्याकडे लक्ष आहे’, हे त्यांना जाणवते आणि त्यांचे गार्‍हाणे करण्याचे प्रमाण न्यून होते.
मुलांना कोणताही पदार्थ खाण्याचा आग्रह करणे टाळावे : आई वडिलांनी मुलाला ‘एखादी भाजी खाल्लीच पाहिजे’, असा आग्रह करू नये. त्याने एखादा पदार्थ खाल्ला नाही, तर काही आठवडे तो पदार्थ त्याला मुळीच देऊ नका. परत देतांना तो वेगळ्या स्वरूपात द्यावा, उदा. पालेभाजी आवडत नसेल, तर पालक, मेथी घालून परोठे करून देणे किंवा अशा भाज्या घालून त्यांना घावन करून देणे, असे पदार्थांचे स्वरूप पालटून द्यावे. म्हणजे मुलेही ते पदार्थ आवडीने खातील.
खाण्या-पिण्याच्या वेळेविषयी फार काटेकोरपणा दाखवू नये. दोन जेवणांच्या मधल्या वेळेत जर त्याला एखादा खाऊ खावासा वाटला, तर अवश्य द्यावा. तेव्हा ‘सकाळी जेवायच्या वेळी जेवला नाहीस आणि आता मात्र खाऊ खायला पाहिजे’, असे म्हणून रागावू नये.
जेवण वाढायच्या ५-१० मिनिटे आधी ‘आता जेवण वाढणार आहे’, अशी सूचना त्याला द्यावी, म्हणजे स्वतःचा खेळ किंवा अभ्यासाची पुस्तके इत्यादी आवरायला त्याला वेळ मिळतो.
मुलांसमवेत जेवतांना आई-वडिलांनी घ्यायची काळजी
जेवणाच्या वेळी सभोवतालचे वातावरण प्रसन्न असले पाहिजे.
जेवणाकडे दुर्लक्ष होऊ नये; म्हणून मुलांच्या जवळ खेळण्यासारख्या वस्तू ठेवू नयेत.
मूल जेवत असतांना स्वतःच्या आवडीनिवडीची चर्चा करू नये.
जेवतांना त्याचे प्रगतीपुस्तक, खोड्या किंवा चुका यांविषयी चर्चा करू नये.

आकांडतांडव करणे: 
मुलाला आकांडतांडव करण्याची सवय जडली की, आई-वडिलांच्या डोकेदुखीला प्रारंभ होतो.
अशा वेळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. त्याच्या अवाजवी मागण्या मुळीच पुरवू नयेत.
मूल शांत झाल्यावर त्याला आधी आकांडतांडव करण्यामागील कारण विचारावे. बहुतेक वेळा कारण क्षुल्लकच असते. त्या वेळी न रागावता प्रेमाने त्याची समजूत काढावी. त्याचे मन दुसरीकडे कुठेतरी गुंतेल, असे करावे, उदा. संगीत, हस्तव्यवसाय, एखादा खेळ यांची आवड त्याच्यात निर्माण करावी.

चोरी करणे: 
मुलाने चोरी केल्यास त्याला रागावून मारू नये. तसे करणे अयोग्य आहे; मात्र ‘आपण केलेली कृती आई-वडिलांना मुळीच आवडलेली नाही’, हे त्याला कळायला हवे.
चोरी करण्यामागील कारणे आणि अडचणी समजून घ्या : मूल तसे का वागले, हे त्याच्याकडून समजून घेऊन अडचणीचे निराकरण करावे. कधी कधी आई-वडिलांवरील रागामुळे मुले अशा गोष्टी करतात. त्यामुळे त्यांचा राग कशाविषयी आहे, ते जाणून घेऊन तो घालवण्याचा प्रयत्न करावा.
त्याने चोरी करून दुसर्‍याची वस्तू उचलून आणल्याचे लक्षात आल्यास त्याला ती लगेच परत करायला सांगावी.
चुकांसाठी शिक्षा करणे : काही वेळा शिक्षाही करावी लागते, उदा. त्याने चोरलेले पैसे व्यय केले असतील, तर घरातील कामे करणे, स्वतःची ताट-वाटी धुवायला लावणे, खाऊ न देणे अशा प्रकारच्या शिक्षा कराव्यात. या गोष्टीने आवर पडलेला नाही, हे लक्षात आल्यावर मानसोपचार तज्ञांचे मत अवश्य घ्यावे. जर त्याने पैसे व्यय केले असतील, तर त्यासाठी शिक्षा म्हणून जेवण न देणे किंवा घरातील शारीरिक श्रम होणारी कामे करण्यास सांगावे.
मुलाला जाणीव होईल, अशा पद्धतीने त्याच्याशी बोलणे
घरातील पैसे नाहीसे झाले असतील, तर ‘तू अमुक अमुक पैसे घेतलेले आहेस. ते लगेच परत दे आणि यापुढे तुला पैसे लागतील, तेव्हा माझ्याकडे मागत जा. मग काय करायचे, ते बघू’, असे त्याला सांगावे. जर त्याने चोरी केल्याचे नाकारले, तर त्याच्याशी वाद घालू नये किंवा ते मान्य करायची त्याला गळही घालू नये.
चोरी केल्यावर त्याला ‘तू असे का केलेस’, असा प्रश्न विचारू नये. मग मूल खोटे काहीतरी सांगते. केवळ त्याला एवढेच म्हणावे, ‘तुला पैसे हवे होते, हे तू मला सांगितले नाहीस, त्याचे वाईट वाटले.’

खोटे बोलणे: 
खोटे बोलण्याची कारणे : खरे बोलले, तर शिक्षा होईल किंवा आई-वडील रागावतील; म्हणून मुले खोटे बोलतात. काही मुले स्वतःविषयी फुशारकी मारण्यासाठी किंवा स्वतःला महत्त्व मिळावे, यासाठी खोटे बोलतात.
खोटे बोलण्यामागील कारण शोधून मुलाला विश्वासात घेऊन समजवावे : मुले कशासाठी खोटे बोलली, हे शोधून त्याप्रमाणे उपाय करावे, उदा. शिक्षेची भीती असल्यास त्याला विश्वासात घेऊन ‘शिक्षा करणार नाही’,असे पटवून द्यावे, म्हणजे तो खरे सांगेल. मग खोटे का बोलू नये, हे त्याला समजवावे.
खोट्या गोष्टी सांगणे टाळण्यासाठी करावयाची क्ऌप्ती : जर मूल न्यूनगंडामुळे खोटी फुशारकी दाखवत असेल, तर त्याच्यातील चांगले गुण, त्याची चांगली वागणूक इत्यादी गोष्टींकडे त्याचे लक्ष वेधावे. त्यामुळे त्याचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो खोट्या गोष्टी सांगणे टाळतो.

अभ्यास न करणे:
शाळेतून आल्यावर मुलांना लगेच अभ्यासाला बसवू नका : सध्या शाळेत मुलांना पुष्कळ विषय असतात आणि तितकाच गृहपाठही दिला जातो. त्या ओझ्याने त्यांना अभ्यासाचाच कंटाळा येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी शाळेतून आल्यावर लगेचच मुलाला अभ्यासाला न बसवता त्याचे खाणे-पिणे झाल्यानंतर एक घंटा त्याला खेळू द्यावे आणि मग अभ्यासाला बसवावे.
मुलाची इतर विषयातील आवड लक्षात घ्या : कधी कधी मुलाला दुसर्‍या विषयात आवड निर्माण झाल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी ही आवड जर चांगली असेल, उदा. संगीत, चित्रकला किंवा एखादा खेळ याच्यात त्याला रस निर्माण झाला असेल, तर त्याला ते करू द्यावे. अर्थात वेळेचे बंधन अवश्य घालावे. तो दैनंदिन अभ्यास प्रतिदिन करील, हेही बघावे.
शाळेत येण्या-जाण्याच्या नियमिततेच्या संदर्भात मुलाचा आढावा घ्या. पालकांनी मधून मधून शाळेत जाऊन मूल वेळेवर अन् नियमितपणे शाळेत येते कि नाही आणि त्याची वर्तणूक कशी आहे, याकडेही लक्ष ठेवावे; कारण सध्या ‘इलेक्ट्रॉनिक गेम्स’कडे मुले बरीच आकर्षित झालेली आढळतात. काही मुले तर चक्क शाळा बुडवून तेथे जातात. अशा खेळांसाठी पैसा लागतो. त्यासाठी घरचे पैसे चोरणे चालू होते आणि अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. असे झाल्यास मुलाची शाळासुद्धा पालटणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ती मुले गुन्हेगारीच्या जगात खेचली जातात.
एखाद्या विषयात चांगले गुण मिळाल्यास त्याचे कौतुक करावे. छोटीशी भेट दिल्यास त्याला ‘अजून अभ्यास करावा’, असे वाटेल.

मुख्य म्हणजे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असावे. आई-वडिलांच्या समस्यांनी मुलाची मनःशांती ढळू नये, याविषयी जागरूक असावे.
एकाग्रता वाढवण्यासाठी संमोहनशास्त्राचा वापर केल्यास पुष्कळ लाभ होतो.
सोप्या घरगुती मानसोपचारांनी मुलांच्या बहुतेक समस्या दूर करता येतात. तसेच आई-वडिलांच्या योग्य वागण्याने त्याचे व्यक्तीमत्त्वही निरोगी रहायला साहाय्य होते. त्यामुळे पुढे मानसिक विकार व्हायचा संभव उणावतो.

सकारात्मक मानसिक आरोग्य


मधुमेह, रक्तदाबाचे आजार वगैरे आजार आपल्याला माहित आहेत, जे एक शारीरिक आजार आहेत. शारीरिक आजाराचा आपल्या मानसिक आरोग्याशी काही संबंध असतो का ? हो , खरतर या दोन्ही गोष्टींमध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे. 

आपण माणूस म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे शरीर आणि दुसरे म्हणजे मन. जसे एका कम्प्युटरमध्ये त्याचा हार्डवेअर असतो जे आपण  डोळ्याने बघतो ते म्हणजे जणू आपले शरीर आणि तो कम्प्युटर्स चालविण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअर म्हणजे आपले मन. आणि आपण नेहमी प्रमाणे बाहेरून दिसणाऱ्या गोष्टीनाच  जास्त महत्त्व देतो आणि ज्या गोष्टींमुळे त्या वस्तूत चालतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तसंच काही आपल्या मानसिक आरोग्य सोबत होत असते. आपण नेहमी आपल्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष देतो. त्याची काळजी घेतो. वेगळे वेगळे क्रीम्स लावतो. शरीर सूडोल दिसणायसाठी व्यायाम करतो. चांगले कपडे घालतो. जसे आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाइलला आपण एखादा स्क्रीन कव्हर बसवतो, पण तो चांगला चालण्यासाठी अँटी व्हायरस टाकताना दहा वेळा विचार करतो. तसेच काही आपण आपल्या मानसिक आरोग्यासोबत करतो. आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण काहीही करत नाही. कधीच काळजी घेत नाही. ते बिघडल्यास ते दुरुस्त करून घेण्याची इच्छाशक्ती देखील आपल्यामध्ये नसते. मानसिक आजारासाठी लागण्याच्या औषधोपचार कडे देखील आपण  दुर्लक्ष करतो. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक आजार उदाहरणार्थ मधुमेह हृदयविकार ब्लड प्रेशर यासारखे आजारांची सुरुवात देखील ताणतणावामुळे होते.  योग्य त्या वेळेवर आपण जर आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. त्याचप्रमाणे शारीरिक आजारांमुळे सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बराच काळ असलेला आजारपण आणि त्यामुळे आपल्या कामावर आणि व्यवसायिक करिअरवर देखील परिणाम होतो.
त्यामुळे मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासोबत तितकेच महत्त्वाचे आहे.  

व्यसनाधिनता, दारू तंबाखू सिगारेट सारखे व्यसनांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात . व्यसन हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. माणूस ताण तणाव कमी करण्यासाठी कधीकधी व्यसन करतो. ज्याने आपल्याला तात्पुरते बरे वाटते  पण यागोष्टी ताण तणाव कमी न करता मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात. व्यसनामुळे शारीरिक आजार निर्माण होतात जसे मधुमेह ज्याच्यामुळे आपल्या शरीराला जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते. सोबतच व्यसनांमुळे औषधांचादेखील आपल्या शरीरावर परिणाम कमी होतो. 

मानसिक आरोग्ययासाठी आपण जर काळजी घेतली तर आपण बरेच शारीरिक आणि मानसिक आजार टाळू शकतो, तर ते कसे करायचे ?

सर्वात प्रथम म्हणजे झोप. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे ,जी आपल्या शरीराला आणि मनाला आराम देते.  वेळेवर लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यानंतर पौष्टिक आहार आणि पाणी हे आपल्या शरीराला ताणतणाव सहन करण्याची ताकद देतात.  झालेली झीज भरून काढतात.  योग, मेडिटेशन, चालणे ,जॉगिंग करणे ,कामा व्यतिरिक्त कुठलाही प्रकारचा व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो.  व्यायाम केल्याने एन्डोरफीन नावाचे रसायन आपल्या शरीरात तयार होते जे आपल्याला दिवसभर प्रसन्न ठेऊन सकारात्मक मानसिक आरोग्य जपण्यास मदत करते.  

कामातून वेळ काढून आपल्या जवळच्या नातेवाइकांना, मित्रांना  भेटा. आपले मन मोकळे करा. हास्य विनोद आनंद यासारख्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी विटामिन चे काम करतात.आपण आपल्या मनात अनेक गोष्टी कोंडून ठेवतो ज्याच्या मुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते. आपण बोलायला हवे, आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर बोलवून  मन मोकळे करा. एखादी कुठली गोष्ट आपल्याला वाईट वाटत असेल तर रडून आपले मन मोकळे करा. एखादी गोष्ट लिहून सुद्धा आपण आपले मन मोकळे करू शकतो. 

ताणतणाव टाळण्यासाठी आपले काम वेळेचे वेळेवर करा. जर असं वाटत की कुठलीही गोष्ट हातातून निघून जात असेल तर जवळच्या व्यक्तिची मदत घ्या. ताणतणाव दूर करण्यासाठी  आपण  तणाव ग्रस्त आहोत  याची जाणीव असणे  व ते स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे आपण जेव्हा ही गोष्ट विकार तो तेव्हाच त्याचा उपाय शक्य आहे ताण तणाव टाळण्यासाठी व्यसन हा उपाय नाही त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा.  

या प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपलं मानसिक आरोग्य सकारात्मक होऊ शकते. जसे आपले शरीर आजारी पडू शकते तसंच आपले मनदेखील आजारी पडू शकत तर ते कसे ओळखावे जर तुम्हाला अस वाटत ताणतणाव वाढत आहे आणि त्यामुळे जर तुमची झोप बिघडत आहे, भूक कमी होत आहे, चिडचिड होत आहे किंवा उदासीन वाटत आहे सतत भीती वाटणे सतत चिंता होणे  चंचल वाटणे  कामात लक्ष न लागणे खूप दिवसापासून डोके दुखणे कामात मन न लागणे  कामाच्या ठिकाणी  चुका होणे  कामात लक्ष न लागणे लगेच राग येणे सतत थकवा जाणवणे तर मानसोपचार तज्ञांना भेटून त्याच्यावर ताबडतोब उपचार करणे गरजेचे आहे. काही रासायनिक बदलांमुळे देखील या गोष्टी होत असतात जे काही गोळ्या नियमित घेऊन देखील बरे केले जाऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपचार वेळेवर घेणे खूप महत्वाचे आहे तसे न केल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास काही कालांतरानंतर तेच त्रास औषधांनी देखील बरे होत नाहीत किंवा औषधांचा फारसा परिणाम दिसून येत नाही.