डिप्रेशन व त्यावर मात

डिप्रेशन किंवा नैराश्य ही भावना फक्त उदास असणे किंवा एकाकी वाटणे इतकेच नव्हे तर हा एक मानसिक आजार आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या स्पर्धेमुळे जगभरात नैराश्याचा आकडा वाढत चालला आहे. जगात प्रत्येक वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असतात त्यात नुसत्या भारत देशाचा आकडा 135000 इतका मोठा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अनुसार भारतात पाच करोड लोक नैराश्यग्रस्त आहेत.


नैराश्याची बरीच कारणे आहेत. मेंदूमधील रासायनिक बदल हे प्रमुख कारण आहे. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामिन नावाची तीन महत्वाची रसायने आहेत, ज्यांच्या पातळीतील फरकाने निराशाच सुरुवात होते. सामाजिक ताणतणाव, नोकरीची चिंता, कुटुंबात किंवा नोकरीच्या ठिकाणी चालू असलेला शारीरिक, मानसिक किवा लेंगिक छ्ळ, कुठूम्बातील इतर व्यक्ती सोबतचे मतभेद, कुठूम्बातील अतिशय आवडत्या व्यक्तीची मयत, बराच काळ असलेला आजारीपणा, दारूचे व्यसन ही काही प्रमुख कारणे आहेत. नैराश्य अनुवंशिक सुद्धा असू शकतो.

नैराश्याची  काही लक्षणे:
नैराश्यग्रस्त व्यक्तीला प्रामुख्याने झोपेच्या तक्रारी असतात. नेहमीपेक्षा लवकर जाग येणे, झोप पूर्ण न होणे, झोप जरी लागली असेल तर सकाळी झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे. त्यामुळे दिवसभर टवटवीत न वाटणे. जास्त झोप येणे किंवा सतत जोपून राहावे असे वाटणे सुद्धा नैराश्याची लक्षण असू शकते.
भूक कमी होऊन वजन कमी होणे. जेवायची इच्छा न राहणे. भूक नसतानाही सतत काहीतरी खात राहणे सुद्धा नैराश्याची एक लक्षण असू शकते.
उदास वाटणे ,कंटाळा येणे, जीवनात रस नसल्यासारखे वाटते, कुठल्याही गोष्टीत मन न लागणे, कोणाशीही बोलू न वाटणे ,अगोदर ज्या गोष्टी आवडीने करायच्या त्या गोष्टीची रुची नसणे. सतत रडू येणे, एकटेपणा जाणवणे, अभ्यासात व कामात एकाग्रता न येणे त्या मुळे चुका होणे.
सतत आत्महत्येचे विचार येणे हे सर्वात गंभीर लक्षण आहे.

आपल्या कुठूम्बातील वक्ती मध्ये नैराश्याची लक्षणे कशी ओळखावी:
व्यक्तीच्या स्वभावात बदल होणे, आवडीनिवडीत फरक पडणे, अति चिडचिडेपणा येणे, झोप व भूक नसण्याच्या सारख्या तक्रारी येणे,  नकारात्मक गोष्टी बोलत राहणे. मारण्याच्या गोष्टी बोलत राहणे. कामावर न जाणे.

नैराश्यावर उपचाराची गरज आहे का ?
हो, कारण नैराश्याचा परिवारावर, समाजावर व आपल्या स्वतःच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात, ते नैराश्यग्रस्त व्यक्ती ने समजून घ्यायला हवे. झोपेच्या तक्रारी मुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडते, उदासीन व्यक्ती आपल्या शरीराची देखील काळजी घेत नाहीत. कुठला आजार असेल तर त्याच्याकडे व त्याच्या औषधोपचारा कडेसुद्धा दुर्लक्ष केले जाते. त्याला पर्याय म्हणून अशा व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकतात. नैराश्यग्रस्त व्यक्ती परीवारापासुन लांब होतात, घरातील वातावरण बिघडते, वाद होतात, मुलांमध्येसुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. कामात चुका होतात, नोकरीवर अनुपस्थितीमुळे आपल्या करिअरवर देखील फरक पडू शकतो. आत्महत्या हा नैराश्याचा सर्वात वाईट परिणाम आहे.

नैराश्यावर उपाय
वरील कुठल्याही प्रकारची लक्षणे स्वतःमध्ये किंवा आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींमध्ये दिसून आल्यास त्याचे उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात या वास्तव स्थितीचा स्वीकार करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पुर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल. तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जवळच्या मित्र-मंडळी, कुटूंबातील एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता. तुमचे काम वेळेत पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजे त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल व नैराश्य येणार नाही.
जीवनात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष वेधा. तुमच्या मनाला उभारी आणणा-या गोष्टी शोधा. तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा. उदासीन वाटू लागल्यास एखादा मनोरंजक व्हिडीओ,सुंदर फोटो अथवा निसर्गसौदर्य पहा. टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी स्थिती अधिक खराब करु शकतात, त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा. फ्रेंड, कलिग, प्रियकर/प्रियसी किंवा एखादी कुटुंबातील व्यक्ती अशा कोणत्याही नात्यात तुम्हाला वाईट अनुभव येत असेल तर त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवा. पोषक आहार घ्या, आहारात विविध रंगाच्या पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला आवडणा-या गोष्टींची यादी करा.

जशी शारीरिक आजार औषध उपचारांनी बरे होतात तसेच मानसिक आजार सुद्धा औषधांनी बरे होतात. मेंदू घडलेल्या रासायनिक बदल ज्याच्यामुळे नैराश्य निर्माण होत आहे तो बदल औषधानी पूर्ववत करण्यास मदत होऊ शकते. आत्महत्येचे विचार येणे सुद्धा औषधोपचाराने कमी केले जाऊ शकते. त्यासाठी लवकरात लवकर आपल्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.

डॉ संपदा अणवेकर
मानसोपचार तज्ञ